Srirang Godboles article on Veer Savarkars Punyatithi (Srirang Godboles article on Veer Savarkars Punyatithi)

Subject: Srirang Godbole’s article on Veer Savarkars Punyatithi
डॉ.श्रीरंग गोडबोले यांचा लेख…
  दिक्कालाला भेदून जाणाऱ्या युगपुरुषांमध्ये ज्यांची नि:संशय गणना होते, त्या सावरकरांचे स्मरण आम्ही का करावे? आमच्या पारतंत्र्यात वाटयाला येणारे छळाचे जास्तीत जास्त हलाहल त्यांनी पचविले, त्याची कृतज्ञता म्हणून? त्यांनी आमच्यावर केलेल्या ऋणातून उतराई व्हावे म्हणून? की त्यांचे स्मरण करून आम्ही त्यांचा गौरव करतो आहोत असे आम्हांस वाटते म्हणून?
फाल्गुन शुध्द षष्ठी शके 1887, अर्थात दि. 26 फेब्रुवारी 1966! त्या दिवशी सकाळी 11 वाजून 10 मिनिटांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी प्राप्तव्य आणि कर्तव्याच्या पूर्तीच्या समाधानात आपली जीवनयात्रा संपविली. ब्रह्मवेत्ते योगी उत्तरायणात, शुक्लपक्षात आणि भर दिवसा म्हणजे सूर्यनारायणाला साक्ष ठेवून देहविसर्जन करतात असे भगवद्गीतेत सांगितले आहे. गीतेने सांगितलेला कर्मयोग जन्मभर आचरणाऱ्या सावरकरांनी मृत्यूच्या बाबतीतही आपला नेम चुकविला नाही. ज्याला आयुष्यभर हुलकावणी दिली, त्या मृत्यूचाच हात धरून सावरकरांनी त्याला आपल्याजवळ ओढले. तेवीस दिवस प्रायोपवेशन करून मृत्युंजय वीराने मृत्यूला कवटाळले. सावरकरांना जाऊन पन्नास वर्षे झाली आहेत. व्यक्तीला आयुष्य असते तसे व्यक्तीच्या स्मृतीलाही आयुष्य असते. स्मृतीचे आयुष्य त्या व्यक्तीच्या कर्तृत्वावर, समाजाला तिने दिलेल्या योगदानावर ठरते. म्हणून श्रीराम, श्रीकृष्ण आणि गौतम बुध्द यांची स्मृती हजारो वर्षे जिवंत आहे. दिक्कालाला भेदून जाणाऱ्या युगपुरुषांमध्ये ज्यांची नि:संशय गणना होते, त्या सावरकरांच्या स्मृतीचे काय? त्यांचे स्मरण आम्ही का करावे? आमच्या पारतंत्र्यात वाटयाला येणारे छळाचे जास्तीत जास्त हलाहल त्यांनी पचविले, त्याची कृतज्ञता म्हणून? त्यांनी आमच्यावर केलेल्या ऋणातून उतराई व्हावे म्हणून? की त्यांचे स्मरण करून आम्ही त्यांचा गौरव करतो आहोत असे आम्हांस वाटते म्हणून?
अक्षम्य आणि आत्मघातकी उपेक्षा
आजच्या पिढीला सावरकर ठाऊक आहेत? शालेय पुस्तकांत ते क्वचितच भेटतात. इतिहासाच्या पुस्तकात जेमतेम एखाद-दुसरा परिच्छेदच त्यांच्यासाठी राखून ठेवला जातो. समुद्रात उडी मारणारा आणि अंदमानात काळया पाण्याची शिक्षा भोगणारा एक क्रांतिकारक अशी त्यांची एक ओळीची माहिती वर्गातल्या हुशार मुलाला माहीत असते. जनाची आणि मनाचीसुध्दा लाज नसलेली आमची वृत्तपत्रे त्यांच्याविषयी अपवादानेच लेख छापतात. आजही अशक्य वाटणारी समाजसुधारणा सावरकरांनी त्या काळात रत्नागिरीसारख्या सनातन्यांच्या बालेकिल्ल्यात घडवून आणली, याचा उल्लेख फुले-शाहू-आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात होत नाही. अन्य प्रांतांत तर सावरकर समाजसुधारक होते याची गंधवार्ता नाही. महाराष्ट्रातील तमाम सरस्वतीचे उपासक त्यांच्या साहित्यसेवेविषयी मूग गिळून बसतात. आमच्याकडील हिंदू संघटना हिंदुत्वाच्या भाष्यकारांमध्ये विवेकानंद, अरविंद, टिळक, ऍनी बेझंट, गोळवलकर गुरुजी, अगदी गांधींचेसुध्दा नाव घेतील, पण सावरकरांचे नाव घेतले तर हायसे वाटावे अशी स्थिती आहे. इतके दिवस आमच्या राज्यकर्त्यांनी सावरकरांची स्मृती पुसून टाकण्याचा – नव्हे, ती कलंकित करण्याचा चंग बांधला होता. सावरकरांच्या तैलचित्राला पुष्पहार घालणारे, लंडनसारख्या ठिकाणी प्रकट कार्यक्रमात त्यांचे नाव आदराने घेणारे पंतप्रधान आता कुठे आम्हाला मिळाले आहेत, शपथविधी झाल्यावर सावरकर स्मारकाला भेट देणारे मुख्यमंत्री मिळाले आहेत. आमच्या एखाद्या अत्याधुनिक रणगाडयाला किंवा युध्दनौकेला सावरकरांचे नाव देण्याचे संरक्षण मंत्रालयात कुणाला सुचत नाही. स्वतंत्र भारताच्या केंद्र सरकारने सावरकरांना दोनदा तुरुंगवास घडविण्याचे पाप केले, त्याचे प्रायश्चित्त म्हणून एखाद्या सरकारी योजनेला सावरकरांचे नाव देण्याची बुध्दी आमच्या राज्यकर्त्यांना अद्याप होत नाही. थोडक्यात, सावरकर आम्हाला ‘आमचे’ वाटत नाहीत. त्यांना ‘आमचे’ म्हणण्यात आम्हांस आजही संकोच वाटतो. क्रांतिकारी समाजसुधारक, बुध्दिवादी विचारवंत, हिंदुत्वाचे अनन्य भाष्यकार, हिंदूंच्या सैनिकीकरणाचे पुरस्कर्ते, आधुनिक तंत्रज्ञानाचे उपासक, सार्वकालिक श्रेष्ठतम राष्ट्रशिल्पकार म्हणून त्यांना देय असलेले श्रेय त्यांच्या पदरात टाकताना आमचा हात आखडतो. त्यांचा मुक्तकंठाने गौरव करताना अजूनही आमची जीभ चाचरते.
अनाकलनीय उपेक्षा
ज्यासाठी जिवाचा आकांत केला, त्या भारतीय प्रजेने आणि प्रजासत्ताकाने सावरकर नामक व्यक्तीची उपेक्षा का केली? रबरी झालेल्या आमच्या शरीरात सावरकर पोलादी कणा घालण्याचे अशक्यप्राय काम करू पाहत होते म्हणून? आमच्या अंगात भिनलेल्या सद्गुणविकृती नामक रोगावर शस्त्रक्रिया करायला निघाले होते म्हणून? खड्गाविना आम्ही स्वातंत्र्य मिळवू अशी शेखी मिरवणाऱ्या आम्हाला ‘स्वातंत्र्यप्राप्ती केव्हाही रक्तशून्य नसते’ हे बजावून सांगितले म्हणून? मुळात अहिंसक असलेल्या, अत्याचाराचा प्रतिकार करणे हे पाप समजणाऱ्या आम्हाला ‘मर्यादित अहिंसा हे पुण्य, आत्यंतिक अहिंसा हे पाप’ असे शिकवत होते म्हणून? ‘ज्या सत्याने मनुष्याचे एकंदरीत कल्याण साधते ते सत्य, सद्गुण, धर्म; पण ज्या सत्याने चोरास सोडून संन्याश्याला फाशी होते, ते सत्यही दुर्गुण, ते सत्यच असत्य’ असे खडे बोल सुनवत राहिले म्हणून? शत्रूला क्षमा करण्यात धन्यता मानणाऱ्या आम्हाला ‘पावित्र्यरक्षण आणि धर्मसंगोपन आमच्या पुरुषांना आणि देवालाही जेव्हा करता येत नाही तेव्हा ते एकतर चितोडची चिता करू शकते, नाहीतर सुडाची सुरी’ अशा जळजळीत शब्दांत ‘सुडाचे तत्त्वज्ञान’ सांगत होते म्हणून? रणछोडदासाची आराधना करणाऱ्या आम्हांस नृसिंहाची उपासना करायला सांगत होते म्हणून? ‘नृसिंहावताराचे मूर्त रूप जरी अकराळविकराळ असले तरी त्याचे अंत:करण हे नराचे आहे, मानवतेचे आहे, त्याचा क्रूर पराक्रम मानवतेच्या विकासाला अत्यंत आवश्यक आहे, अनिवार्य आहे’ हे त्यांचे शब्द आमच्या डोक्यावरून गेले म्हणून? ‘जगात देवही माणसांच्या तोंडच्या प्रार्थनांपेक्षा तोफांच्या तोंडातून येणाऱ्या प्रार्थनांकडे लक्ष देतो’ हे त्यांचे सांगणे आम्हाला असह्य झाले म्हणून? भाबडया आणि बुध्दिहीन रूढींचे दास्य पत्करणाऱ्या, कर्मकांडाला धर्म समजणाऱ्या आम्हाला ‘जे सृष्टिनियम विज्ञानास प्रत्यक्षनिष्ठ प्रयोगान्ती सर्वथैव अबाधित, शाश्वत, सनातन असे आढळून आले आहेत तेच काय ते खरे सनातन धर्म होत’ असे सांगून आमचे कान उपटत होते म्हणून? यंत्रामुळे मनुष्य दुबळा होतो असा गंड असलेल्या आम्हाला ‘मंत्रबळे नव्हे तर यंत्रबळे! शाप नव्हे तर यंत्र हे मनुष्याला अतिमानुष करणारे विज्ञानाचे वरदान होय’ असे निक्षून सांगितले म्हणून? जगाने शांतिदूत म्हणून जयजयकार करावा या उद्देशाने आंतरराष्ट्रीय राजकारण करणाऱ्या आम्हाला ‘राष्ट्राराष्ट्रांचे कारभार नीतिनियमांनुसार कधीही चाललेले नाहीत, त्याच्यापुढे स्वसंरक्षण नि स्वहितवर्धन हेच ध्येय असते’ असे उच्चरवाने सांगून आमची साखरझोप घालवत होते म्हणून? हिंदू-मुस्लीम एकीच्या मृगजळामागे धावण्याची चटक लागलेल्या आम्हाला ‘जितक्या ते अधिक मागण्या करतील तितकेच तुम्ही अधिक शरण जाल, जितके ते अधिक रागावतील तितके तुम्ही त्यांना खूश कराल, जितके ते पदरात पडून घेतील तितके तुम्ही अधिकच देऊ कराल, जितके ते कृतघ्न होतील, तितके तुम्ही त्यांच्या आभाराची याचना कराल’ हे सांगून आम्हाला भानावर आणण्याचा प्रयत्न करत होते म्हणून? ‘ईश्वर-अल्लाह तेरे नाम’ अशा भजनात गुंग असणाऱ्या आम्हाला ‘मुसलमानांचे धर्मवेड त्यांच्या कुराणात आहे’ असे सांगून व्यत्यय आणत होते म्हणून? आम्हाला दिशा न दाखवता आमच्याच मागे फरफटत येणाऱ्यांना डोक्यावर घेणाऱ्या आम्हाला ‘वरं जनहितं ध्येयं, केवला न जनस्तुति:’ या ब्रीदाप्रमाणे आमच्या हिताचे पण अप्रिय सांगणारे सावरकर आम्हांस ‘आमचे’ का बरं वाटावेत?
सावरकर विचार हेच त्यांचे चिरंतन स्मारक
आज सावरकर नसले, तरी त्यांचे जीवन आमच्यासमोर आहे. एखाद्या दंतकथेपेक्षा सुरस असे सावरकरांचे जीवन होते. अनेक श्रेष्ठ गुणांचा समुच्चय त्यांच्या व्यक्तिमत्त्वात प्रकर्षाने झाला होता. सतीचे वाण आणि वास्तवाचे भान असलेला त्यांच्यासारखा दुसरा महापुरुष सापडणे कठीण! ज्ञानयुक्त कर्माचा साक्षात पडताळा म्हणजे सावरकर! राष्ट्राच्या अक्षरश: प्रत्येक अंगाचा मूलगामी, तर्कशुध्द आणि नि:संदिग्ध विचार सावरकरांनी मांडला आहे. अनेक अर्थपूर्ण शब्द प्रथमच योजणाऱ्या अथवा ते रूढ करणाऱ्या सावरकरांनी मराठी भाषेचे स्वत्व टिकवले आहे. संपूर्ण राष्ट्रासाठी संस्कृतनिष्ठ हिंदीचा आग्रह धरला आहे. मराठयांच्या इतिहासाचा मागोवा घेतला आहे आणि हिंदूंना त्यांच्या इतिहासातील सोनेरी पानांचे स्मरण करून दिले आहे. इस्लामचा मुळातून अभ्यास करणाऱ्या सावरकरांनी हिंदू-मुस्लीम संबंधांविषयी कालातीत मार्गदर्शन केले आहे. जातिभेद आणि अस्पृश्यता यांच्या निर्मूलनाची आवश्यकता सांगितली आहे. हिंदू संघटनेच्या लाभासाठी नव्हे, तर मानवतावादाशी सुसंगत म्हणून समतेचा पुरस्कार केला आहे. बुवाबाजीवर आणि खुळचट व्रतवैकल्यांवर प्रहार केला आहे. कालबाह्य रूढींवर आणि विज्ञानाच्या कसोटीवर न उतरणाऱ्या धर्मश्रध्दांवर कठोर आघात केला आहे. हिंदू समाजाला जखडणाऱ्या बेडया फेकून देण्याचा आदेश दिला आहे. परधर्मात गेलेल्यांना परत आणण्याची हाक दिली आहे. कोणत्या सामाजिक सुधारणा पाहिजेत याचे दिग्दर्शन केले आहे. यंत्रयुगाचे स्वागत करण्याचा पुकारा केला आहे. राष्ट्राच्या शस्त्रसज्जतेवर भर दिला आहे. विज्ञाननिष्ठा आणि बुध्दिवादाची कास धरण्याचे आवाहन केले आहे. आपले स्वत्व हिंदुत्वात आहे याची जाणीव करून दिली आहे आणि त्याचे विवरण केले आहे.
सावरकरांचा पोकळ जयजयकार अथवा नाहक निंदा न करता या सर्व विचाराचा सम्यक आणि समग्र अभ्यास करणे आवश्यक आहे. सामाजिक व राजकीय क्षेत्रांत काम करणाऱ्यांनी, जनतेची मने आणि मते घडविणाऱ्यांनी, देशाची नीती ठरविणाऱ्या धुरिणांनी हा अभ्यास करणे अत्यावश्यक आहे. आज हिंदुत्व विचारधारेकडे वाढत्या संख्येत आकर्षित होणाऱ्या तरुण वर्गाने सावरकरांचे ‘हिंदुत्व’ आणि ‘हिंदुराष्ट्रदर्शन’ हे ग्रंथ अनिवार्यपणे वाचले पाहिजेत. त्यांचे अध्ययन केल्याशिवाय वैचारिक बैठक पक्की होणे अशक्य आहे. हिंदुत्व ही जुनाट, कालबाह्य, प्रतिगामी विचारसरणी नसून ती प्रवाही, नित्यनूतन, निखळ पुरोगामी आहे, हे सावरकर साहित्याचा अभ्यास केल्यावर उमजेल.
सावरकर विचाराशिवाय गत्यंतर नाही
सावरकरांची उपेक्षा करणे आता या समाजाला परवडण्यासारखे नाही. कृतज्ञता म्हणून समाजाने सावरकरांची आठवण जागती ठेवलीच पाहिजे, कारण जिवंत समाजाचे ते लक्षण आहे. पण त्यांच्या ऋणातून उतराई होण्याच्या भावनेने त्यांचे स्मरण कोणी करू नये. कारण ते ऋण न फिटणारे आहे. त्यांचा गौरव करण्यासाठीसुध्दा त्यांचे स्मरण कोणी करू नये, कारण ते त्याच्या केव्हाच पलीकडे गेले आहेत. शिवाय त्यांचा गौरव करण्याइतके आम्ही कोणी मोठे नाही. मग त्यांचे स्मरण का करावे?
हे उपेक्षित वीरा! तू बाहू उंचावून कंठशोष करत होतास, तेव्हा आम्ही मात्र आमचे कान घट्ट बंद करून घेतले. आता कुठे तुझ्या त्या शब्दांचे मोल आम्हाला कळू लागले आहे. हे बहिष्कृत महानायका! तुझी भेदक दृष्टी चुकवून आम्ही वाळूत नाक खुपसून बसलो होतो. तुला ओलांडण्याचा, तुला वळसा घालून पुढे जाण्याचा पुष्कळ प्रयत्न केला. पण तुझ्याशिवाय आम्हाला गती नाही, हे आता आम्हाला उमजू लागले आहे. हे प्रोत्तेजक भास्करा! तुझ्याकडे पाठ फिरवून आम्ही काजव्यांच्या मागे लागलो होतो. तुझ्या विचारांच्या प्रकाशातच आमच्या उत्कर्षाचा मार्ग आम्हाला सापडेल याची खूणगाठ आता पक्की झाली आहे. हे कालजयी योगेशा! तुला लोकप्रियतेचा मुकुट मिळाला नाही, म्हणून तू पराभूत झालास असे म्हणणारे महाभाग आहेत. त्या वेडयांना सांगू की पराभव तुझा नव्हे, आमचा झाला – नव्हे, तो आम्ही ओढवून घेतला. तुझे ऐकले तेव्हा आमचा जय झालाच की! तुझा अव्हेर केला तेव्हाच आम्ही पराभव चाखला. ज्यांना लोकप्रियतेचा मुकुट मिळाला ते खोटे ठरले, खरा तू ठरलास. काळाने त्यांच्यावर सूड घेतला. अजेय आणि अमर तर तू आहेस. हे लोकोत्तर द्रष्टा! तुझे स्मरण आणि अनुसरण आम्हाला आणि आमच्या पिढयांन् पिढयांना करावेच लागेल. कारण त्यावाचून आता आम्हाला गत्यंतर नाही.
Source: https://skanda987.wordpress.com/2018/03/01/srirang-godboles-article-on-veer-savarkars-punyatithi/